
बीड, 21 एप्रिल (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील खाजगी शाळांनी विशिष्ट दुकानातूनच वह्या-पुस्तके आणि गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्याने पालकांची होणारी आर्थिक लूट आता थांबणार आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने कडक परिपत्रक जारी केले असून शाळांनी अशा प्रकारची सक्ती केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नियमानुसार सर्व शाळांना एनसीईआरटी (NCERT) आणि एससीईआरटी (SCERT) यांचीच पाठ्यपुस्तके वापरणे बंधनकारक आहे.
खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांमधून शाळांना मोठी 'टक्केवारी' मिळत असल्याने पालकांवर अनावश्यक भुर्दंड लादला जात असल्याचे समोर आले आहे. पालकांनी अशा सक्तीविरुद्ध शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षकांकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रारीची शहानिशा करून तथ्य आढळल्यास संबंधित शाळांचे व्यवस्थापन अडचणीत येऊ शकते, अशी तंबीच शिक्षण विभागाने दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis