रत्नागिरी : चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम
रत्नागिरी, 21 एप्रिल, (हिं. स.) : चिपळूण शहरातील मुख्य व अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जोरदार कारवाई केली. रस्त्यालगतच्या गटारांवर दुकानातील माल रचल्याने तसेच फेरीवाल्यांनी तेथेच दुकाने था
रत्नागिरी : चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम


रत्नागिरी, 21 एप्रिल, (हिं. स.) : चिपळूण शहरातील मुख्य व अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जोरदार कारवाई केली.

रस्त्यालगतच्या गटारांवर दुकानातील माल रचल्याने तसेच फेरीवाल्यांनी तेथेच दुकाने थाटल्यामुळे ही मोहीम राबविण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर दुकानातील साहित्य व विविध माल रचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नगरपरिषद ते पान गल्ली या मार्गावर अतिक्रमणाचे प्रमाण वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.

गटारांवर फळे, कांदे, बटाटे, प्लास्टिक साहित्य, चप्पल आदी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. तसेच ग्रामीण भागातील काही महिला रस्त्यावरच भाजी व फळ विक्री करत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. काही ठिकाणी तर गटाराबाहेर थेट रस्त्यावरच माल मांडण्यात येत होता.

याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने मुख्याधिकारी संजय जाधव यांनी याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नगरपरिषदेच्या बांधकाम विभागासह अतिक्रमण हटाव पथकाने संयुक्त मोहीम हाती घेतली.

या कारवाईदरम्यान गटारांवरील व रस्त्यालगतचा माल हटविण्यात आला. यापुढे अशा प्रकारे अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात नगरपरिषद ते पान गल्ली दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली असून, पुढील काळात संपूर्ण बाजारपेठेत दररोज अशी कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संदेश टोपरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande