
परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत 10 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करणार्या बांधकाम कामगारांच्या लाभार्थी निवडीसाठी पाथरी येथे 15 मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली.
पाथरी विधानसभा क्षेत्रासाठी बांधकाम कामगार स्थानिक नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी आमदार विटेकर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. मंडळाच्या निर्देशानुसार समितीमार्फत नोंदणी, नूतनीकरण व विविध लाभांच्या अर्जांचा निपटारा करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. या अनुषंगाने परभणी येथील जिल्हा बांधकाम अधिकारी कार्यालयात समितीची पहिली बैठक पार पडली.
पाथरी विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांच्या अंतिम निवडीसाठी 15 मे रोजी पाथरी येथे समितीची मंजुरी बैठक होणार आहे. यापूर्वी दाखल झालेले अर्ज जिल्हा कामगार अधिकार्यांनी निकाली काढावेत, तसेच पात्र लाभार्थ्यांनी 10 मेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन आमदार विटेकर यांनी केले आहे. बैठकीस समितीचे अध्यक्ष आमदार राजेश विटेकर, सदस्य सचिव तात्याराव कराड, सदस्य विकास वडकर, रवी परांडे, रागिणी सुरवसे, विठ्ठल घाडगे तसेच नोंदणी अधिकारी सौदागर, पारखे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis