लातूरमध्ये आरटीओचा जनजागृती उपक्रम; हेल्मेटचे महत्त्व पटवून देणारी घटना चर्चेत
लातूर, 21 एप्रिल (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) वाहनधारकांमध्ये जनजागृतीचा विशेष उपक्रम राबवण्यात आला. RTO अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर प्रकाश
हेल्मेट


लातूर, 21 एप्रिल (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) वाहनधारकांमध्ये जनजागृतीचा विशेष उपक्रम राबवण्यात आला. RTO अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर प्रकाश मुळे आणि जयंत गुरव यांनी आशिव टोल नाका, नांदेड रोड, औसा येथे वाहन तपासणी मोहीम राबवली.

या मोहिमेत हेल्मेट वापर, सीटबेल्टची सक्ती, ओव्हरस्पीडिंग, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे तसेच अपघातग्रस्तांना मदत करण्याबाबत वाहनधारकांना मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान सुमारे 50 वाहनधारकांना थांबवण्यात आले, त्यापैकी फक्त एकानेच हेल्मेट घातलेले आढळल्याने अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

या एकमेव हेल्मेटधारी वाहनचालकाची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, त्यांच्या डोळ्यासमोर एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्या घटनेने त्यांच्यावर खोल परिणाम झाला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःहून हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली. हा अनुभव ऐकताना उपस्थित अधिकारी आणि वाहनधारक काही काळ स्तब्ध झाले.

या घटनेचा उपयोग जनजागृतीसाठी करत अधिकाऱ्यांनी उपस्थितांना सुरक्षित वाहनचालक पद्धतीचे महत्त्व पटवून दिले. हेल्मेट आणि सीटबेल्टचा नियमित वापर तसेच वाहतूक नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे, हे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या उपक्रमानंतर अनेक वाहनधारकांनी भविष्यात नियमांचे पालन करण्याचा आणि हेल्मेट वापरण्याचा संकल्प केला. अधिकाऱ्यांनीही सांगितले की, केवळ दंडात्मक कारवाई नव्हे तर जनजागृतीद्वारे अपघात रोखणे हेच त्यांच्या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande