
परभणी, 21 एप्रिल, (हिं.स.) - महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहत, त्यांना तात्काळ कायदेशीर व मानसिक आधार देणारे परभणीतील ‘सखी वन स्टॉप सेंटर’ महिलांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून 28 डिसेंबर 2018 पासून सुरू झालेल्या या केंद्राने आतापर्यंत तब्बल 1,073 पीडित महिलांना न्याय मिळवून देत आशेचा किरण निर्माण केला आहे.
या केंद्रामार्फत पीडित महिलांना पोलीस मदत, कायदेशीर सल्ला, मानसिक समुपदेशन अशा सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. विशेष वकिलांमार्फत कायदेशीर प्रक्रियेचे मार्गदर्शन केले जाते, तर मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलांना पुन्हा उभारी देण्यासाठी समुपदेशनाचा आधार दिला जातो. गरजू महिलांसाठी पाच दिवसांपर्यंत सुरक्षित निवासाची सोय देखील येथे उपलब्ध आहे.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती एम. एस. रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र प्रभावीपणे कार्यरत असून, महिलांसाठी एक मजबूत आधारस्तंभ ठरत आहे. परभणीतील नानलपेठ येथील पशुसंवर्धन कार्यालय, पोलीस मुख्यालयासमोर हे केंद्र कार्यरत आहे.
शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, अॅसिड हल्ला व सायबर क्राईमच्या बळी ठरलेल्या महिलांना पोलिस, वकील आणि रुग्णालयात धाव घ्यावी लागते. ही पायपीट थांबवण्यासाठी 'सखी वन स्टॉप सेंटर केंद्र' एकाच छताखाली सहा प्रकारच्या सेवा २४ तास विनामूल्य पुरवते.
केंद्र प्रशासक तेजस्विनी कांबळे यांनी महिलांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या छळाला बळी पडल्यास न घाबरता पुढे यावे.
पीडित महिलांना तातडीच्या मदतीसाठी शासनाचा '181' हा हेल्पलाइन क्रमांक किंवा केंद्राच्या फोन 02452-225505 मोबाईल 7875787540 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
‘सखी वन स्टॉप सेंटर’ हे केवळ सेवा केंद्र नसून, संकटात सापडलेल्या महिलांसाठी न्याय, संरक्षण आणि नव्या आयुष्याची नवी दिशा देणारे ठिकाण ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis