
नाशिक, 21 एप्रिल (हिं.स.) : संसदेत ज्या विरोधकांनी २०२३ साली 'महिला आरक्षण विधेयक' हे जनगणना आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर (डिलिमिटेशन) लागू होईल, असे मान्य केले होते; त्यांनीच आता एनडीएकडे दोन-तृतीयांश बहुमत नसल्याचे पाहून भूमिका बदलली आहे. या विरोधात महाराष्ट्रातून १ कोटी तर नाशिक जिल्ह्यातून १ लाख महिलांच्या पाठिंबा असल्याचा स्वाक्षरी संसदेत पाठविणार असल्याचे आ. देवयानी फरांदे यांनी स्पष्ट केले.
एन डी पाटील रोडवरील भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार फरांदे बोलत होत्या यावेळी शहराध्यक्ष सुनील केदार , प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे रोहिणी नायडू, संध्या कुलकर्णी, सुजाता करजगीकर , कोमल मेहरोलिया, छाया देवांग आदी उपस्थित होत्या. आ. फरांदे म्हणाल्या की, महिलांचे हक्क डावलणारे प्रतिगामी मानसिकतेचे विरोधी पक्ष हेच या हक्कांचे मारेकरी असून त्यांनी देशातील नारीशक्तीचा अपमान केला आहे. १७ एप्रिल रोजी संसदेत जे घडले, तो देशाच्या इतिहासातील 'काळा दिवस' आहे. महिलांच्या अधिकारांची अशी गळचेपी होत असेल, तर विरोधकांना गुडघे टेकून महिलांच्या हक्कांना मान्यता द्यायला लावेल, असा अभूतपूर्व जनमताचा रेटा उभारण्यात येत आहे. त्यात नाशिक जिल्हा देखील आघाडीवर राहणार असल्याचे आ. फरांदे यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV