
नाशिक, 21 एप्रिल (हिं.स.) : जेलरोड परिसरातील राहुलनगर येथील पारा अव्हेन्यू सोसायटीत रविवारी रात्री घडलेल्या लिफ्ट अपघातामुळे मोठी खळबळ उडाली आहे. लिफ्टचा वायर रोप तुटल्याने ती तिसऱ्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर कोसळली आणि या दुर्घटनेत तीन महिन्यांच्या बाळंतिणीसह चार लहान मुलं जखमी झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीत एका चिमुकलीच्या बारशाचा कार्यक्रम सुरू असताना पाहुण्यांची ये-जा सुरू होती. रात्री सुमारे साडेदहा वाजता लिफ्ट तळमजल्यावरून चौथ्या मजल्याकडे जात असताना तिसऱ्या मजल्याजवळ अचानक तिचा मुख्य वायर रोप तुटला. त्यानंतर लिफ्ट वेगाने खाली कोसळून तळमजल्यावर आदळली.
अपघाताचा मोठा आवाज झाल्याने रहिवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत गौरी अभिजीत मकवान (24), ज्या तीन महिन्यांच्या बाळंतिणी आहेत, तसेच हर्षित अभिजीत मकवान (4), वैभवी मंगेश मकवान (10) आणि मनस्वी मंगेश मकवान (4) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, रहिवाशांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. मागील दोन महिन्यांपासून लिफ्टमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याच्या तक्रारी बिल्डर आणि लिफ्ट कंपनीकडे करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे हा अपघात नसून हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या प्रकरणी रहिवाशांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून लिफ्टचे तांत्रिक ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV