परभणी - स्त्री हीच शेती संस्कृतीच्या शोधाची जननी : कवी प्रा. इंद्रजीत भालेराव
परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)वेदांच्याही अगोदरच्या काळापासून शेतीचा शोध लागला असल्याचे निष्पन्न झाले असून एकदम सुरुवातीच्या काळात मारून खाण्याऐवजी पेरून खायला सुरुवात केली तेथूनच शेती संस्कृतीची सुरुवात झाली. या शेती संस्कृतीची जननी मात्र स्त्रीच आहे,
परभणी - स्त्री हीच शेती संस्कृतीच्या शोधाची जननी : कवी प्रा. इंद्रजीत भालेराव


परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)वेदांच्याही अगोदरच्या काळापासून शेतीचा शोध लागला असल्याचे निष्पन्न झाले असून एकदम सुरुवातीच्या काळात मारून खाण्याऐवजी पेरून खायला सुरुवात केली तेथूनच शेती संस्कृतीची सुरुवात झाली. या शेती संस्कृतीची जननी मात्र स्त्रीच आहे, असे प्रतिपादन कवी इंद्रजीत भालेराव यांनी केले.

मराठवाडा केसरी कै. भाई अण्णासाहेब गव्हाणे प्रतिष्ठानच्यावतीने जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भाई अण्णासाहेब गव्हाणे स्मृती व्याख्यानमालेत कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी ‘शोध शेती संस्कृतीचा’ या विषयावर विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधिज्ञ ऍड. अशोक सोनी, माजी आमदार ऍड. विजयराव गव्हाणे, भीमराव हत्तीअंबिरे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, हवामान तज्ञ पंजाब डख, रविराज देशमुख, स्वराजसिंह परिहार, दादासाहेब नाईकवाडे मनपा सदस्य अक्षय देशमुख, दादासाहेब देशमुख दशरथ तुपसुंदर अजयराव गव्हाणे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भाई अण्णासाहेब गव्हाणे यांच्या प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने झाली. स्वागतगीत मोहन आल्हाट यांनी सादर केले. प्रास्ताविक मा. आ. विजयराव गव्हाणे यांनी केले. याप्रसंगी महु येथील भीमरत्न पुरस्कार प्राप्त भीमराव हत्तीअंबिरे, व मानद डिलीट पदवी प्राप्त दशरथ तुपसुंदर तर रमेश नाईकवाडे सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.

पुढे बोलतांना कवी भालेराव म्हणाले, वेदांच्याही अगोदर शेती संस्कृतीला सुरुवात झाली असली तरी वैदिक काळात शेती बाबत सविस्तर विवेचन पाहावयास मिळते यानंतर रामायण महाभारत अधिकारातही शेतीचे वर्णन आलेले आहे. पराशर व कश्यप ऋषींनी शेतीवर ग्रंथ पण लिहिलेले आहेतख असेही ते म्हणाले.

बुद्धकाळात समृद्ध शेती पाहावयास मिळते. शेतकरी ही सुखी असल्याचे या काळात असल्याच्या नोंदी आहेत. त्यानंतरच्या हाल सातवाहन काळातही गाथा सप्तर्शी ग्रंथातून शेती बाबत विवेचन आहे. संत चक्रधरांपासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, आगरकर, साने गुरुजी आदींचे लेखनामध्ये शेतीबाबत विचार आलेले आहेत, असे नमूद करीत कवी भालेराव यांनी त्या त्या काळातील शेतीबाबत अतिशय ओघवत्या शैलीत शेती संस्कृतीचा शोध त्यांनी मांडला.

अनेक संतांनी मांडलेल्या शेतकर्याच्या प्रश्नांचा धागा पकडत शेती मातीत राबणारे आणि शेतकर्यासाठी आंदोलन करणारे विचारांचे पक्के लढवय्ये म्हणजे मराठवाडा केसरी कै. भाई अण्णासाहेब गव्हाणे यांचा काळाच्या पटलावर अमित ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला परिचय आहे, असे प्रतिपादनही कवी भालेराव यांनी केले. यावेळी कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या कोंडी, दोन एकर आणि पोशिंदा या तीनही कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती पुणे येथील डॉ. दीपक चांदणे यांच्या प्रतिमा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली. या तीनही पुस्तकाचे कवी प्रा. इंद्रजीत भालेराव व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande