
इम्फाल, 21 एप्रिल (हिं.स.) : मणिपुरच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी नोंदवण्यात आली असून, त्याचे केंद्र कामजोंग जिल्ह्यात होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, हा भूकंप सकाळी 5.59 वाजता झाला. धक्के जाणवताच कामजोंग आणि आसपासच्या भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकजण घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचे केंद्र अक्षांश 24.703 उत्तर आणि रेखांश 94.415 पूर्व येथे, सुमारे 62 किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले. या धक्क्यांचा परिणाम शेजारच्या नागालँड आणि आसाम राज्यांमध्येही जाणवला.
सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. यापूर्वी सोमवारी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे रात्री 8.32 वाजता रिश्टर स्केलवर 3 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होते. तसेच सोमवारी सकाळी जपानमध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे समुद्रात सुमारे 80 सेंटीमीटर उंच लाटा उसळल्या आणि किनाऱ्यावर आदळल्या. त्यानंतर जपानमध्ये सुनामीचा इशाराही देण्यात आला होता.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी