
रत्नागिरी, 21 एप्रिल, (हिं. स.) : कोकणातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी ‘आसमंत’ संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या महिला सबलीकरण कार्यक्रमांतर्गत मत्स्यपदार्थ प्रक्रिया व मूल्यवर्धन विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रशिक्षण उपक्रमासाठी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संबंधित तज्ज्ञांनी मार्गदर्शन करत महिलांना मत्स्यप्रक्रिया उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छता निकष, मूल्यवर्धनाच्या संधी आणि बाजारपेठेतील संभाव्यता याविषयी सखोल माहिती दिली. या संस्थांचा सहभाग हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरण्यास कारणीभूत ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षणात महिलांनी प्रात्यक्षिकांद्वारे विविध उत्पादने तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले.
‘आसमंत’ संस्था पर्यावरण संवर्धन, बालविकास आणि भारतीय शास्त्रीय संगीत प्रचाराबरोबरच महिला सबलीकरणाच्या क्षेत्रातही सातत्याने प्रभावी काम करत आहे. ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविणे, उद्योजकतेला चालना देणे आणि स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योग निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या प्रशिक्षणामुळे महिलांना लघुउद्योगाच्या माध्यमातून मत्स्यपदार्थ प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक प्रगतीस नवी दिशा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
‘आसमंत’च्या विविध उद्दिष्टांबरोबरच महिला सबलीकरणाच्या क्षेत्रातील हे कार्यही तितकेच प्रभावीपणे सुरू असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात सकारात्मक सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी