रेणापूर तालुक्यात १२ बेडचा उष्माघात नियंत्रण कक्ष सज्ज
लातूर, 22 एप्रिल, (हिं.स.)। रेणापूर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्कता बाळगली असून उष्माघाताचा धोका लक्षात घेता तालुक्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकूण १२ बेडचे उष्माघात नियंत्रण कक्ष सज
उष्माघात


लातूर, 22 एप्रिल, (हिं.स.)। रेणापूर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्कता बाळगली असून उष्माघाताचा धोका लक्षात घेता तालुक्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकूण १२ बेडचे उष्माघात नियंत्रण कक्ष सज्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर रेड्डी यांनी दिली.

हवामान विभागाने मे महिन्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. त्यानुसार बिटरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ बेड, खरोळा येथे ३ बेड, पोहरेगाव येथे २ बेड, पानगाव येथे २ बेड आणि कारेपूर येथे २ बेड अशा एकूण १२ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षांमध्ये तापमापक, आयस पॅक, बीपी मशीन, ओआरएस पावडर, सिल्वर सल्फाडियाझिन क्रीम, कॅलामाईन लोशन, आयव्ही फ्लुइड्स, लोराझेपाम, डायझेपाम, बी-कॉम्प्लेक्स आदी आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कुलर, पंखे आदी सुविधा उपलब्ध असून २४ तास वैद्यकीय अधिकारी सेवेत तैनात ठेवण्यात आले आहेत. उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत किंवा १०८/१०२ या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. रेड्डी यांनी केले आहे. तसेच उन्हामुळे शेती व पशुधनावरही परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी पिकांना सकाळी किंवा सायंकाळीच पाणी द्यावे. मुळांजवळ आच्छादन करून ओलावा टिकवावा. दुपारी ११ ते ४ या वेळेत फवारणी टाळावी. जनावरांना दिवसातून ३ ते ४ वेळा पाणी पाजावे आणि गोठ्यांमध्ये थंडावा ठेवण्याची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande