
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.)। : राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेमुळे जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाला मोठी चालना मिळत आहे. जानेवारी २०२४ ते मार्च २०२६ या कालावधीत रायगड जिल्ह्यात एकूण ६ हजार २८० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. यासाठी सुमारे ३ कोटी १४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा यामागील उद्देश आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, बालमृत्यू कमी करणे, बालविवाहाला आळा घालणे तसेच शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.
योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मावेळी ५ हजार रुपये, पहिली, सहावी, अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यावर अनुक्रमे ६, ७ आणि ८ हजार रुपये, तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये असा एकूण १ लाख १ हजार रुपयांचा लाभ दिला जातो. हा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
दरम्यान, प्राप्त ७ हजार १९८ अर्जांपैकी उर्वरित ९१८ लाभार्थ्यांना निधी उपलब्ध होताच लवकरच लाभ देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अधिकाधिक पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)