रत्नागिरी : यंदा कोकणात ९२ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज
रत्नागिरी, 22 एप्रिल, (हिं. स.) : यावर्षी कोकणात ९२ टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला जात असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली. मे महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारीच्या बैठकीच्या पार
रत्नागिरी : यंदा कोकणात ९२ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज


रत्नागिरी, 22 एप्रिल, (हिं. स.) : यावर्षी कोकणात ९२ टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला जात असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.

मे महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री आणि अधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी आढावा घेतला. या बैठकीला श्री. सदाफुले उपस्थित होते. त्यांनी या बैठकीतील माहिती दिली. ते म्हणाले, कोकणात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बैठकीला कृषी विभागाचे संचालक, आयुक्त, सर्व जिल्हा कृषी अधीक्षक उपस्थित होते. यामध्ये विभागनिहाय तयारीचा आढावा घेताना वातावरणातील बदलांविषयी हवामान विभागाकडून आलेली माहिती सादर करण्यात आली. एप्रिल महिन्यातच खतांची मागणी नोंदवली आहे. पाऊस वेळेत सुरू झाला तर शेतकऱ्यांना भातपेरणीवेळी खत कमी पडू नये यासाठी नियोजन कृषी विभागाने केले आहे. विविध प्रकारची आवश्यक भातबियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या बियाण्यांच्या वापरासाठी जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये २५ एप्रिलपर्यंत हवामानात मोठे बदल होणार आहेत. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, काही दिवस उष्ण व दमट हवामानासह वेगवान वारा वाहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही श्री. सदाफुले म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande