



रायगड, 22 एप्रिल (हिं.स.)। : तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यंदाच्या “रायगड रत्न” पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. शिक्षण, कामगार व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची दखल घेत दैनिक महासागर वृत्तपत्रातर्फे हा सन्मान प्रदान करण्यात आला.
देवळी गावचे सुपुत्र सुजित तुकाराम भोजने यांना “आदर्श शिक्षक” पुरस्काराने गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करत नैतिक मूल्ये, शिस्त व सामाजिक जाणीव रुजविण्यावर भर दिला आहे. डिजिटल शिक्षण, स्पर्धा व मार्गदर्शन शिबिरांद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली आहे. त्याचप्रमाणे माणगाव तालुक्यातील प्रदीप तुकाराम आडीत यांनाही आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उपक्रमाधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांची विशेष दखल घेण्यात आली.
कामगार क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणारे महावितरणचे लाईनमन केशव महादेव जांबरे यांना “आदर्श कामगार” पुरस्कार प्रदान करण्यात आला. कठीण परिस्थितीतही अखंड वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या धाडसी व कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे त्यांना हा सन्मान मिळाला.
तर सांस्कृतिक क्षेत्रात रेपोली गावातील श्रेया राकेश भोस्तेकर हिने “आदर्श सांस्कृतिक” पुरस्कार पटकावला. अल्पवयातच नृत्य, अभिनय व विविध कलांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या सर्व मान्यवरांच्या सन्मानामुळे माणगाव तालुक्याचा गौरव वाढला असून, त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)