
नांदेड, 22 एप्रिल, (हिं.स.)। नांदेड शहरातील काही भागात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात विविध ठिकाणी अचानक छापा टाकून एकूण १७ तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करून ८ हजार ३०० रुपये दंड वसूल केला.
सदर कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे व नोडल अधिकारी डॉ. हणमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड व एमजीवीएसचे मंगेश गायकवाड तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पांचाळ उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis