
अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.)
अतिरिक्त रेशन धान्य वाटपातील गंभीर अनियमिततेप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाने कठोर कारवाई करत सहा रेशन दुकानदारांचे प्राधिकारपत्र कायमस्वरूपी रद्द केले आहे. तसेच संबंधितांकडून अतिरिक्त धान्याची बाजारभावानुसार रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी दिले आहेत.
तहसीलच्या ग्रामीण भागातील तत्कालीन निरीक्षण अधिकारी (आयओ) जितेंद्र पाटील यांनी जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सुमारे ३८७४ क्विंटल अतिरिक्त रेशन धान्य विशिष्ट सात दुकानदारांना वितरित केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. यामध्ये सुमारे १.४० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाटील यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.नोटीस देऊन खुलासा मागविल्यानंतर तो असमाधानकारक ठरल्याने सहा दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, चांदूर बाजार तालुक्यातही ४१३ क्विंटल धान्य वाटप प्रकरण समोर आले असून संबंधित दुकानदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली असून प्रशासनाच्या या निर्णयामुळे रेशन व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी