रायगड - पशुधनावर उष्णतेचा ताण टाळण्यासाठी प्रशासन सज्ज
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.)। राज्यात संभाव्य ‘एल निनो’ परिणामामुळे वाढत्या तापमानाचा आणि उष्णलहरींचा धोका लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत. पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने पशुपालक व कुक्कुटपालकांसाठी सव
रायगड - पशुधनावर उष्णतेचा ताण टाळण्यासाठी प्रशासन सज्ज


रायगड, 22 एप्रिल (हिं.स.)। राज्यात संभाव्य ‘एल निनो’ परिणामामुळे वाढत्या तापमानाचा आणि उष्णलहरींचा धोका लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत. पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने पशुपालक व कुक्कुटपालकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देत पशुपालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.

उष्णलहरींच्या काळात पशुधनाला पुरेसे स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. पशुधनाच्या आहारात क्षार मिश्रण व जीवनसत्वांचा समावेश करावा, तसेच दुभत्या जनावरांना संतुलित आहार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तीव्र उन्हाच्या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत पशुधनाला विश्रांती देऊन सावलीत किंवा हवेशीर ठिकाणी ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे.

गोठ्यांच्या छतावर उष्णता कमी करणारी व्यवस्था करणे, स्प्रिंकलरचा वापर करणे तसेच लसीकरण व जंतनाशक उपाययोजना वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे विभागाने नमूद केले आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुधनाला थंड ठिकाणी हलवून पाण्याचा मारा करावा व जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला असून फिरती पथके तातडीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. नागरिकांनी रस्त्यावरील पशू-पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असेही आवाहन विभागाने केले आहे. ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पशुधनाचे संरक्षण करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande