
जिल्हाधिकाऱ्यांच्या यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना
लातूर, 22 एप्रिल (हिं.स.) : मॉन्सून काळात संभाव्य पूर, अतिवृष्टी, वीज कोसळणे आणि इतर आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मॉन्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अनेक अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले की, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे स्वरूप अनिश्चित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभागांनी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्ण तयारी ठेवावी. आपत्कालीन प्रतिसाद कार्यपद्धती (SOP) अद्ययावत करण्यावर त्यांनी भर दिला.
बैठकीत जिल्ह्यातील जुने पूल, तलाव आणि इतर पायाभूत सुविधांचे तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक संरचनांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक ठिकाणी दुरुस्ती व गाळ उपसा तातडीने पूर्ण करण्याचेही आदेश देण्यात आले.
पूरप्रवण भागांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे, शोध व बचाव साहित्य सज्ज ठेवणे तसेच ग्रामपंचायत स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
महानगरपालिका व नगरपालिकांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करावी, तसेच आरोग्य विभागाने साथीच्या आजारांसाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा, असेही सांगण्यात आले.
महावितरणला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आपत्तीच्या काळात सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पूरप्रवण गावे आणि संभाव्य धोक्यांची सविस्तर माहिती सादर केली.
या बैठकीतून जिल्हा प्रशासनाने मॉन्सूनपूर्व तयारी अधिक बळकट करत सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis