
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.)। : शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मोठा आधार ठरत असून, रायगड जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३८५ रुग्णांना सुमारे ३ कोटी ३५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून या निधीच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि अर्जांचा तातडीने निपटारा यामुळे मदत वितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक झाली आहे. तसेच सामंजस्य करार आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून विविध रुग्णालये, संस्था व दाते यांचे सहकार्य मिळत आहे.
या निधीतून कॉक्लियर इम्प्लांट, हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुस प्रत्यारोपण, कर्करोग उपचार, डायालिसिस, मेंदूचे आजार, अपघातग्रस्त रुग्ण अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळून जीवनदान मिळत आहे.
दरम्यान, बालकांच्या कर्करोग उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, सीएसआर अंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण उपचार सुलभ होणार आहेत. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरातील ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटींपेक्षा अधिक मदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील मदतीचा वेगही लक्षणीय वाढला आहे.
अधिक माहितीसाठी व सहाय्यासाठी रुग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)