बाळापूर मतदारसंघात २०० किमी पाणंद रस्त्यांचा आराखडा
पहिल्या टप्प्यात २५ किमी कामांना प्राधान्य अकोला, 22 एप्रिल (हिं.स.) : बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत सर्वहंगामी रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना 2026’ अंतर्गत सुमारे 200 किल
Photo


पहिल्या टप्प्यात २५ किमी कामांना प्राधान्य

अकोला, 22 एप्रिल (हिं.स.) : बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत सर्वहंगामी रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना 2026’ अंतर्गत सुमारे 200 किलोमीटर पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यापैकी चालू आर्थिक वर्षात 25 किलोमीटर रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश आमदार नितीन देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या संदर्भात 22 एप्रिल रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांना शेतापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी टप्प्याटप्प्याने पाणंद रस्त्यांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आमदार देशमुख यांनी सांगितले की, या रस्त्यांमुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होईल, तसेच शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल. विद्यमान तरतुदीनुसार एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 25 किलोमीटर पाणंद रस्त्यांना मंजुरी देता येत असल्याने, प्रथम टप्प्यात तेवढ्याच कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उर्वरित रस्त्यांसाठी पुढील टप्प्यांमध्ये प्रस्ताव सादर करून कामे मार्गी लावण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे, शिवसेना नेते बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख, उपविभागीय अधिकारी संतोष येवलीकर, तहसीलदार वैभव फरताळे, प्रभारी तहसीलदार दीपक केंद्रे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता उमेश वानखडे, उपअभियंता संजय राठोड, गटविकास अधिकारी सतीश नायसे तसेच भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक सोळंके उपस्थित होते.

------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande