पनीरच्या नावाखाली ‘चीज ऍनालॉग’ची विक्री; ग्राहकांनी सावध राहावे – अन्न व औषध प्रशासन
अकोला, 22 एप्रिल (हिं.स.) : काही उपाहारगृहे व खाद्यपदार्थ विक्री आस्थापनांमध्ये पनीरच्या नावाखाली “चीज ऍनालॉग” प्रकारातील पदार्थ वापरला जात असल्याचे निदर्शनास आले असून ग्राहकांनी पनीर खरेच दुधापासून बनविलेले आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन अन
पनीरच्या नावाखाली ‘चीज ऍनालॉग’ची विक्री; ग्राहकांनी सावध राहावे – अन्न व औषध प्रशासन


अकोला, 22 एप्रिल (हिं.स.) : काही उपाहारगृहे व खाद्यपदार्थ विक्री आस्थापनांमध्ये पनीरच्या नावाखाली “चीज ऍनालॉग” प्रकारातील पदार्थ वापरला जात असल्याचे निदर्शनास आले असून ग्राहकांनी पनीर खरेच दुधापासून बनविलेले आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत सुरक्षित व सकस अन्नपदार्थ नागरिकांना उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे. भारत हा दुग्ध उत्पादनात अग्रगण्य देश असून पनीर हा भारतीय आहारातील महत्त्वाचा व पोषक घटक मानला जातो. प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे व खनिजांनी समृद्ध असल्याने शाकाहारींसाठी पनीर हा उत्तम प्रथिनांचा स्रोत आहे.

मात्र, अन्न सुरक्षा व मानके (अन्नपदार्थ मानके व अॅडिटिव्ह नियम), 2011 नुसार “पनीर” हे केवळ दुधापासून तयार केलेले असावे लागते. त्याउलट “चीज अॅनालॉग” हा पदार्थ खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आदी घटकांपासून बनविला जातो. तो दिसायला पनीरसारखा असला तरी तो प्रत्यक्षात पनीर नसतो.

अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स व फास्ट फूड विक्रेते मोठ्या प्रमाणावर चीज ऍनालॉगचा वापर करीत आहेत. मात्र, याबाबत ग्राहकांना योग्य माहिती दिली जात नसल्याने त्यांची दिशाभूल व फसवणूक होत आहे.

तसेच बाजारात “नॉन डेअरी चीज”, “चीज ऍनालॉग”, “व्हेज चीज” किंवा “चीज” अशा नावांनी हे पदार्थ विकले जात असल्याने ग्राहकांनी खरेदी करताना व खाद्यपदार्थ खाताना विशेष खबरदारी घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande