
अकोला, 22 एप्रिल (हिं.स.)।अकोला जिल्हा परिषद अकोला अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने विविध आरोग्यविषयक योजनांची व्यापक जनजागृती मोहीम सध्या जिल्ह्यात जोरात सुरू आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होत आहे.
या मोहिमेत एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण, टीबी मुक्त भारत अभियान (टप्पा २), वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव, ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान तसेच पॅलिएटिव्ह केअर सेवा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा, गटसभा तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध स्पर्धा व उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे.गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ८ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत १४ वर्षे पूर्ण व १५ वर्षे अपूर्ण असलेल्या मुलींना समाविष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील या वयोगटातील २८,३७६ मुलींना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी ८,०५९ मुली ग्रामीण तर २०,३१७ मुली शहरी भागातील आहेत. आतापर्यंत १,२८८ मुलींना लस देण्यात आली असून पुढील काळात हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.दरम्यान, या मोहिमेचा एक भाग म्हणून पातूर तालुक्यातील माळ राजुरा येथील सुधाकरराव नाईक विद्यालयात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. यावेळी नितीन थुटे, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. मुख्याध्यापक व शिक्षकांनी या उपक्रमाला सहकार्य केले.या सर्वसमावेशक जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक बदल होत असून विशेषतः एचपीव्ही लसीकरण मोहिमेत वाढता प्रतिसाद दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे