मुर्तीजापुर : आगीमुळे झाड कोसळले, दुचाकीस्वार गंभीर जखमी
अकोला, 22 एप्रिल (हिं.स.) : मुर्तीजापुर तालुक्यात अकृषक जमिनींच्या लेआउटचा वेग वाढत असताना पर्यावरणीय हानीचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. मुर्तीजापुर–सोनोरी मार्गावर वर्षानुवर्षे उभे असलेले एक जुने लिंबाचे झाड अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याने कोसळ
Photo


अकोला, 22 एप्रिल (हिं.स.) : मुर्तीजापुर तालुक्यात अकृषक जमिनींच्या लेआउटचा वेग वाढत असताना पर्यावरणीय हानीचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. मुर्तीजापुर–सोनोरी मार्गावर वर्षानुवर्षे उभे असलेले एक जुने लिंबाचे झाड अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याने कोसळले आणि या घटनेत एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे.

अनभोरा येथील शेतकरी बक्कुभाई गुंजाळ हे सकाळी साधारण 8.30 वाजता या मार्गावरून जात असताना अचानक झाड रस्त्यावर कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या दोन्ही हातांना फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा रस्ता शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या सतत वापरात असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, मात्र ती थोडक्यात टळली. घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, लेआउटसाठी जमीन मोकळी करण्याच्या उद्देशाने झाडांना जाणीवपूर्वक आग लावण्याचा प्रकार वाढत आहे. तथापि, अशा घटनांवर ठोस कारवाई होत नसल्याने “माफिया पॅटर्न” वाढत असल्याचा आरोपही होत आहे.

या घटनेमुळे परिसरातील पर्यावरण सुरक्षा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande