
नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.)।
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आरक्षण विधेयक, निवडणुका, आरक्षण, राज्य आणि राष्ट्रीय राजकारण तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की 2023 मध्ये लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर करण्यात आले होते आणि महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी ते अत्यंत आवश्यक होते.
डिलिमिटेशननंतर 33 टक्के जागा वाढवून महिलांसाठी 273 जागा वाढवण्याचा प्रस्ताव होता आणि एकूण जागा 816 करण्याची योजना होती. मात्र विरोधकांनी, विशेषतः दक्षिण भारतातील लोकांना दिशाभूल करून हे विधेयक फेल केले. “54 मते मिळाली असती तर विधेयक पास झाले असते,” असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे महिलांना आरक्षण मिळण्यास विलंब झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नसल्यामुळे महिला आरक्षण अडचणीत येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की ओबीसी यादीत अनेक मुस्लिम जाती आधीच समाविष्ट आहेत. मोदी सरकारला फायदा होऊ नये म्हणून विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक रोखले आणि महिलांशी अन्याय केला, असा आरोप त्यांनी केला.
देशात पाच राज्यांत निवडणुका होत असून सत्तेत कोण येते हे महत्त्वाचे नसल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस सत्तेत असताना ईव्हीएमचा मुद्दा कोणी उपस्थित केला नव्हता, असे त्यांनी नमूद केले. मतदार यादीतील डुप्लिकेट नावे काढण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आणि मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ममता बॅनर्जी यांना पूर्वी सहानुभूतीचा फायदा झाला होता, मात्र आता परिस्थिती बदलली असून लोक भाजपला संधी देतील, असे त्यांनी सांगितले. तमिळनाडूतही पक्षाला संधी मिळेल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात 2 ते 3 जागा मिळाल्यास पक्ष अधिकृत होईल आणि दलित, मराठा व ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांच्या आघाडीत ममता बॅनर्जी यांना आणण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की बंगालमधील जनता स्वतः निर्णय घेईल. “त्या आल्या तरी स्वागत, पण आमचे सरकार येईल,” असे त्यांनी म्हटले. अजित पवार यांच्या अपघाताबाबत त्यांनी दुःख व्यक्त करत चौकशीची मागणी केली आणि घातपात असल्यास कारवाई व्हावी, असे सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरी विरोधाची गरज नव्हती, असे सांगत सर्वांनी चर्चेला बसावे, असे त्यांनी आवाहन केले. इराण-अमेरिका तणावावर त्यांनी भारतात चर्चा होऊन शांततामय मार्ग निघावा, असे मत व्यक्त केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तोडगा निघू शकतो, असे सांगितले.
चौकत्व
नाशिकमधील सिन्नर येथील भोंदू बाबाच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी अंधश्रद्धेविरोधात भूमिका घेत “श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी,” अशे आठवले यांनी
स्पष्ट केले. प्रलोभन देऊन धर्मांतर करणे गुन्हा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच रिपब्लिकन पक्ष राज्यभर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV