नाशिक - विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेस तरुण चेहऱ्याला संधी देणार - थोरात
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.)। आगामी विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे. आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीची इच्छा दर्
नाशिक - विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेस तरुण चेहऱ्याला संधी देणार - थोरात


माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.)। आगामी विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे. आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीची इच्छा दर्शविल्यास त्यांना सर्वसंमतीने पाठिंबा दिला जाईल. काँग्रेस पक्षात अनेक इच्छुक असून, नव्या आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते , माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

नाशिक येथे काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आघाडीच्या भूमिके बाबत माहिती दिली. थोरात म्हणाले की, जर ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली नाही, तर काँग्रेसकडून या जागेसाठी उमेदवार निश्चित केला जाईल. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्याशी सविस्तर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील), शरद आहेर, जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे व भरत टाकेकर, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, शहराध्यक्ष आकाश छाजेड, युवक जिल्हाध्यक्ष गौरव पाटील पानगव्हाणे, डॉ. दिनेश बच्छाव, गुणवंत होळकर, उल्हास सातभाई आदी उपस्थित होते.

प्रत्येक राजकारण्याला महत्त्वाकांक्षा असते

विधानपरिषदेची संधी न मिळाल्यास राज्यसभेचा पर्याय स्वीकारणार का, या प्रश्नावर थोरात यांनी थेट नकार न देता आपली भूमिका मांडली. “मी राजकारणात आहे, आणि प्रत्येक राजकारण्याला काही ना काही महत्त्वाकांक्षा असते,” असे म्हणत त्यांनी भविष्यातील राजकीय शक्यता खुल्या असल्याचे सूचित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande