
छत्रपती संभाजीनगर, 22 एप्रिल (हिं.स.)। सरस्वती भुवन (स.भु.) शिक्षण संस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या 'संविधान जागर अभियान' समारोप सोमवारी (ता. २७) सायंकाळी ६:३० वाजता स.भु. प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. यावेळी केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी दिली.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गेल्या वर्षभरात विविध उपक्रमांद्वारे हे अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांपासून सामान्य नागरिकांना संविधानाचे महत्त्व कळावे, यासाठी व्याख्याने, पथनाट्य, रॅली, स्पर्धा आणि जनजागृती कार्यक्रम घेतले गेले. संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत येणारी कर्तव्ये याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. अभियानाची सुरवात २२ फेब्रुवारी २०२५ ला तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झाली होती. वर्षभरात विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संविधान विषयक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवण करण्यात आली.
पथनाट्य, प्रदर्शन, व्याख्याने आणि स्पर्धांमधून संविधानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. समारोप कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, शहर व मराठवाड्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis