
लातूर, 22 एप्रिल (हिं.स.)। राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू करा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा, रिक्त पदे भरा आदी प्रलंबित मागण्यांसंदर्भात सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. जळकोट येथील तहसील कार्यालयातील जवळपास ५० कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे जळकोट तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करा, १ मार्च २०२४ पासून आजपर्यंत सेवानिवृत्तांना निवृत्तीवेतन द्या. व्यापक आरोग्य विमा योजना सुरू करा, चतुर्थश्रेणी व वाहनचालकांच्या पद भरतीस बंदीचा फेरविचार करा, शिक्षकांच्या टीईटी परीक्षा व संच मान्यतेचे प्रलंबित प्रश्न सोडवा, नगरपालिका, नगर परिषद कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्न मार्गी लावा. आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
जळकोट तहसील कार्यालयातील विविध महसूल कर्मचारी तसेच मंडळ अधिकारी व महसूल सहायकांच्या वतीने नायब तहसीलदार रंगनाथ कराड यांना बेमुदत संपाचे निवेदन सादर करण्यात आले. सध्या जनगणनेची कामे सुरू आहेत. या सोबतच दहावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तसेच बारावी नंतरची नीट परीक्षाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे लागणार आहेत, परंतु महसूलचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे आता मोठी अडचण निर्माण होणार आहे. शासनाने काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis