
द्वारका बंदचा फटका : वाहतुकीचा खेळखंडोबा
नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.)।
गुजरात ते मुंबई किनारपट्टीवर शत्रूची टेहळणी करणारी बोट नाशिक रोडच्या उड्डाणपुलाखाली अडकली.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका चौकातील अंडरपासचे काम सुरू झाल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
द्वारका चौक पुढील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याने नाशिकरोडकडून शहराकडे येणारी सर्व अवजड वाहतूक बिटको चौक मार्गे जेलरोड आणि फेम चौकाकडे वळवण्यात आली आहे. मंगळवारी रात्री नौदलाच्या बोटी घेऊन जाणारा ट्रेलर बिटको चौकातून जात असताना, बोटीच्या उंचीमुळे तो उड्डाणपुलाच्या खालच्या भागात फसला. आधीच अरुंद रस्ते आणि त्यात हा अडथळा निर्माण झाल्याने काही वेळातच वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला.
नाशिकरोडची वाहतूक ठप्प
ट्रेलर अडकल्याने रेल्वे स्टेशन आणि सिन्नर फाट्याकडून येणाऱ्या वाहनांच्या रांगा थेट छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. दुसरीकडे दत्तमंदिर, मुक्तीधाम आणि कन्या शाळेपर्यंत वाहने अडकून पडली होती. रात्रीच्या वेळी ही कोंडी झाल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
सामाजिक कार्यकर्त्यांची धाव
बोटीचा ट्रेलर सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तांत्रिक कसरत करावी लागली. यावेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदतीचा हात दिला. काही तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर हा ट्रेलर मार्गस्थ झाला आणि वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली विकासकामे आणि रस्ते खोदाईमुळे नाशिककर त्रस्त आहेत. द्वारका सारखा महत्त्वाचा चौक बंद केल्याने आता नाशिकरोडच्या अंतर्गत रस्त्यांवरही अवजड वाहनांचा भार वाढला असून, प्रशासनाने यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV