लातूरमध्ये खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध
टंचाईच्या अफवांना प्रशासनाचा इन्कार लातूर, 22 एप्रिल (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची खत टंचाई नाही, अशी स्पष्ट माहिती जिल्हा प्रशा
खतसाठा


टंचाईच्या अफवांना प्रशासनाचा इन्कार

लातूर, 22 एप्रिल (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची खत टंचाई नाही, अशी स्पष्ट माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सध्या जिल्ह्यात एकूण 75,167 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे. यामध्ये 38,444 टन संयुक्त खते, 16,082 टन सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी), 11,436 टन युरिया, 8,311 टन डीएपी आणि 894 टन एमओपी खताचा समावेश आहे.

हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा परिणाम होऊन पावसात अनिश्चितता राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खतांची आगाऊ खरेदी करून साठवणूक करण्याची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.

तालुकानिहाय उपलब्धतेनुसार लातूर तालुक्यात सर्वाधिक 2,936 टन युरिया आणि 1,824 टन डीएपी साठा उपलब्ध आहे. त्यापाठोपाठ अहमदपूर (युरिया 1,562 टन, डीएपी 942 टन), निलंगा (युरिया 1,473 टन, डीएपी 1,345 टन), औसा (युरिया 1,398 टन, डीएपी 570 टन) आणि उदगीर (युरिया 726 टन, डीएपी 730 टन) या तालुक्यांचा समावेश आहे. तसेच चाकूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि जळकोट या तालुक्यांमध्येही खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा देशातील खतपुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ गरजेनुसारच खत खरेदी करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande