अहिल्यादेवी जल यात्रेला 25 एप्रिलपासून प्रारंभ
मराठवाड्यातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन परभणी, 22 एप्रिल (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने “गोदा ते नर्मदा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जल यात्रा 2026” या विशेष जनजागृती उपक्रमाला
अहिल्यादेवी जल यात्रेला 25 एप्रिलपासून प्रारंभ


मराठवाड्यातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

परभणी, 22 एप्रिल (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने “गोदा ते नर्मदा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जल यात्रा 2026” या विशेष जनजागृती उपक्रमाला 25 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. जलव्यवस्थापनाबाबत व्यापक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या यात्रेत मराठवाड्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार रामराव वडकुते यांनी केले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेनुसार आत्मनिर्भर आणि समावेशक राष्ट्र उभारणीसाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी जलसंपदा विभाग मिशन मोडवर कार्यरत आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित जल यात्रेच्या नाममुद्रेचे अनावरण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. ही यात्रा 25 एप्रिल 2026 रोजी एकाच वेळी दोन ठिकाणांहून प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथील अहिल्यादेवींचे जन्मस्थान तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीच्या उगमस्थानावरून यात्रेला सुरुवात होईल.

या यात्रेत सुमारे 500 जलयात्री सहभागी होणार असून ते महाराष्ट्रातील 30 विविध नदीखोऱ्यांतील पवित्र जल आणि चौंडी येथील पवित्र माती सोबत घेऊन प्रवास करतील. ही यात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्हे तसेच मध्य प्रदेशातील दोन जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार आहे.

जनजागृती यात्रा क्रमांक 2 ही 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चौंडी येथून निघून अहिल्यानगर येथे पोहोचेल. तर यात्रा क्रमांक 1 ही त्याच दिवशी सकाळी 9 वाजता त्र्यंबकेश्वर येथून सुरू होऊन संगमनेर, शिर्डी, घृष्णेश्वर, गौताळा घाट मार्गे 29 एप्रिल रोजी माहेश्वर येथे पोहोचणार आहे.

यात्रेदरम्यान विविध ठिकाणी जलव्यवस्थापनाचे महत्त्व आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा परिचय करून देणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या यात्रेचा समारोप 29 एप्रिल रोजी माहेश्वर येथे होणार आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande