ठाणे - जांभळी नाका-रेल्वे स्टेशन फेरीवाल्यांबाबत नम्रता कोळी यांची आक्रमक भूमिका
ठाणे, 22 एप्रिल (हिं.स.)। जांभळी नाका ते अशोक टॉकीज, चेंदणी येथील सिडको बसस्टॉप ते अशोक टॉकीज आणि तलावपाळी ते श्री सिद्धिविनायक मंदिर दरम्यानच्या रस्त्यावरील वाढते फेरीवाले आणि फेरीवाल्यांच्या उपद्रवाविरोधात भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी आक्
ठाणे - जांभळी नाका-रेल्वे स्टेशन फेरीवाल्यांबाबत नम्रता कोळी यांची आक्रमक भूमिका


ठाणे, 22 एप्रिल (हिं.स.)। जांभळी नाका ते अशोक टॉकीज, चेंदणी येथील सिडको बसस्टॉप ते अशोक टॉकीज आणि तलावपाळी ते श्री सिद्धिविनायक मंदिर दरम्यानच्या रस्त्यावरील वाढते फेरीवाले आणि फेरीवाल्यांच्या उपद्रवाविरोधात भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी आक्रमक भूमिका घेतली. फेरीवाल्यांविरोधात सातत्याने कारवाई का केली जात नाही, असा सवाल नम्रता कोळी यांनी केला. त्यानंतर फेरीवाल्यांविरोधात कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

जांभळी नाका ते ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत फेरीवाल्यांबाबत नगरसेविका नम्रता कोळी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याचे आजच्या महासभेत चर्चेऐवजी केवळ वाचन झाले. त्यावेळी नम्रता कोळी यांनी आक्रमक भूमिका घेऊन फेरीवाल्यांविरोधात कायमस्वरुपी ठोस कारवाई करण्याचा आग्रह धरला.

जांभळी नाका ते ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंबरोबरच फूटपाथचा ताबाही फेरीवाल्यांनी घेतला आहे. त्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. रस्त्यावरील पादचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा राहत नाही. वाहतूककोंडीने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जांभळी नाका ते ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंतचे केवळ एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दररोज सकाळी व सायंकाळी टीएमटी बसला २५ मिनिटांचा कालावधी लागतो. या रस्त्यावरून दररोज सुमारे दोन ते तीन लाख ठाणेकर प्रवास करीत आहेत, याकडे नम्रता कोळी यांनी लक्ष वेधले.

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर काही समाजकंटक फेरीवाल्यांकडून दादागिरी केली जाते. एकट्या नागरिकाला धमकावले जाते. तर मुली व महिलांची छेड काढल्याचेही अनेक प्रकार घडले आहेत. त्याबाबत समाजमाध्यमांमध्ये व्हिडिओ व्हायरल झाले होते. सातत्याने फेरीवाल्यांची संख्या वाढत असून, फेरीवाल्यांना रोखण्यास महापालिकेचा अतिक्रमण विभाग संपूर्ण अपयशी ठरला आहे. ठाण्यातील नव्हे तर इतर शहरातूनही फेरीवाले येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अतिक्रमण विभाग नक्की करतो काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे का? असा सवाल नम्रता कोळी यांनी लक्षवेधीद्वारे केला होता. त्यावेळी कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे ठोस आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande