जळगाव - १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा;  पशुपालकांसाठी ‘लाईफलाईन’ ठरलेली सेवा
जळगाव, 22 एप्रिल (हिं.स.) पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. जनावरांचे आरोग्य धोक्यात आले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, आता अद्ययावत तंत्रज्ञान आणि १९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळाल
जळगाव - १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा;  पशुपालकांसाठी ‘लाईफलाईन’ ठरलेली सेवा


जळगाव, 22 एप्रिल (हिं.स.) पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. जनावरांचे आरोग्य धोक्यात आले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, आता अद्ययावत तंत्रज्ञान आणि १९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळाला आहे. पशुधनाच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या १९६२ हेल्पलाईनने वर्षभरात उल्लेखनीय यश संपादन करत ग्रामीण भागातील पशुपालकांना मोठा दिलासा दिला आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि मोबाईल वेटरनरी क्लिनिकच्या समन्वयातून ही सेवा प्रभावी ठरत असून, पशुधनाला वेळेत उपचार मिळून हजारो जनावरांचे प्राण वाचले आहेत. वर्षभरात हेल्पलाईनवर एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. त्यापैकी तब्बल ३,७८,०३५ पशुधनाच्या आजारविषयक समस्यांचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील ३४,९७९ पशुपालकांनी या सेवेचा लाभ घेतला असून, ही सेवा त्यांच्या दृष्टीने ‘लाईफलाईन’ ठरली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. कॉल प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दीड तासात पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचते, यामुळे ६४,७५९ पशुधनाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. यात २९,१३० मोठ्या व ३५,५६९ लहान पशुधनाचा समावेश आहे. पूर्वी पशुधनाला किरकोळ आजारासाठीही दवाखान्यात नेणे खर्चिक व वेळखाऊ ठरत होते. मात्र, आता तज्ज्ञ पशुवैद्यक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत असल्याने उपचार सुलभ झाले आहेत. वेळेवर मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवणेही शक्य झाले असून, दुग्धव्यवसाय अधिक शाश्वत व फायदेशीर बनत आहे. १९६२ हेल्पलाईनद्वारे उपलब्ध सेवांमध्ये औषधोपचार, शस्त्रक्रिया, खच्चीकरण, कृत्रिम रेतन, जंतनाशक उपाययोजना, लसीकरण, पशुआहार व आरोग्य मार्गदर्शन, वंध्यत्व तपासणी, आपत्कालीन अपघात सेवा तसेच शासकीय योजनांची माहिती अशा विविध सेवा या हेल्पलाईनद्वारे पुरविल्या जात आहेत. याशिवाय व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातूनही माहिती सहज उपलब्ध होत आहे. कॉल सेंटरमध्ये आधुनिक सॉफ्टवेअर, कॉल रेकॉर्डिंग व फीडबॅक प्रणालीचा वापर केल्यामुळे सेवेचा दर्जा उंचावला आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्राथमिक सल्ला, प्रगत डेटा विश्लेषण व डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीचा समावेश करण्याचे नियोजन आहे. यामुळे पशुपालकांना काही सेकंदात मार्गदर्शन मिळणार असून, दुर्गम भागातील पशुवैद्यकीय सेवांचे नियोजन अधिक परिणामकारक होणार आहे. डिजिटल क्रांतीची ही जोड पशुवैद्यकीय सेवांच्या कार्यक्षमतेत आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरेल, ज्यामुळे पशुधनाची हानी कमी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande