
नंदुरबार, 22 एप्रिल (हिं.स.) पावसाळ्याची चाहूल लागताच कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर, जनजागृती
करण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जगभरात ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने “हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध: आता हे शक्य आहे” (Driven to
End Malaria: Now We Can. Now We Must ) हे घोषवाक्य दिले असल्याची माहिती जिल्हा
हिवताप अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांनीे कळविली आहे.
आजारांचे स्वरूप आणि प्रसार
हिवताप (मलेरिया) हा ‘प्लाझमोडियम’ या परोपजीवी जंतूंमुळे होणारा आणि मादी ॲनाफिलीस डास
चावल्यामुळे पसरणारा आजार आहे. याव्यतिरिक्त डेंगी व चिकुनगुण्या यांसारख्या विषाणूजन्य आजारांचा
प्रसार ‘एडीस इजिप्ती’ डासामुळे, तर हत्तीरोगाचा प्रसार ‘क्यूलेक्स’ डासामुळे होतो. वेळेत उपचार न
मिळाल्यास हे आजार प्राणघातक ठरू शकतात.
डासांची पैदास रोखणे का गरजेचे?
डास प्रामुख्याने मानवी रक्तातील प्रथिनांचा वापर अंडी घालण्याच्या प्रक्रियेसाठी करतात. साठलेले पाणी,
उघडी गटारे, टायर, भंगार सामान आणि बांधकामाच्या ठिकाणी साचलेले पाणी ही डासांची उत्पत्तीस्थाने
आहेत. डासांच्या विविध सवयींमुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक असते, त्यामुळे
प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
नागरिकांनी घ्यायची खबरदारी:
घराभोवतालचे खड्डे व साचलेली डबकी बुजवावीत.
पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकणे लावावीत.
आठवड्यातून किमान एक दिवस पाणी साठवण्याची भांडी घासून पुसून कोरडी करावीत (कोरडा
दिवस पाळावा).
फ्रिज, कुलर, फ्लॉवर पॉट्स, कुंड्या, डबे व अन्य वस्तुंमध्ये पाच दिवसापेक्षा जास्त काळ पाणी
साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा आणि पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालावेत.
मोठ्या पाणी साठ्यांमध्ये डास अळी खाणारे ‘गप्पी मासे’ सोडावेत.
आरोग्य विभागाचे आवाहन
कुठलाही ताप हा हिवताप असू शकतो. त्यामुळे ताप आल्यास तातडीने जवळच्या सरकारी दवाखान्यात
जाऊन रक्ताची मोफत तपासणी करून घ्यावी. हिवताप आढळल्यास पूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे, कारण अर्धवट उपचार घेतलेला रुग्ण पुन्हा आजार पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतो. आरोग्य विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व्हेक्षण आणि फवारणी मोहिमेत जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन
डॉ. सोनवणे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर