
अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.) : सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील महाजनपुरा येथे सुमारे पाच एकर जमीन गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाला (म्हाडा) देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
महसूल व वनविभागाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार, महाजनपुरा (ता. जि. अमरावती) येथील सर्व्हे क्रमांक २०/१ मधील जागा प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही जमीन केवळ एक रुपया प्रति चौरस मीटर या नाममात्र दराने ‘भोगवटादार वर्ग-दोन’ या अटीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या निर्णयानुसार, संबंधित प्रकल्पाचे काम जमीन ताब्यात घेतल्यानंतर तीन वर्षांच्या आत सुरू करणे बंधनकारक असेल. तसेच या जागेचा वापर केवळ मंजूर गृहनिर्माण प्रकल्पासाठीच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीची मोजणी पूर्ण करून भविष्यात अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाजनपुरा येथील ही जागा मोक्याच्या ठिकाणी असल्याने प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
याबाबत बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “ही जागा अत्यंत योग्य ठिकाणी असून नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या तीन वर्षांत गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यावर भर दिला जाईल. तसेच बांधकामाचा दर्जा आणि नियोजनावरही विशेष लक्ष दिले जाईल.”
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी