
सोलापूर, 22 एप्रिल, (हिं.स.)। शहरातील विविध नागरी समस्यांची गांभीर्याने दखल घेत महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी आज समाचार चौक ते कन्ना चौक, कन्ना चौक परिसर तसेच जोडबसवन्ना चौकातील जमखंडी पुलाजवळ प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
समाचार चौक ते कन्ना चौक दरम्यान टाकण्यात आलेल्या अंडरग्राउंड लाईट केबलवरील युटिलिटी चेंबरची दुरवस्था लक्षात घेऊन आयुक्तांनी पहाणी केली. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे तुटलेली किंवा योग्यरित्या बसवलेली नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रभागातील नगरसेवक श्री. प्रवीण दर्गो lपाटील यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्याना सर्व चेंबर दुरुस्त करण्याचे आदेश दिले. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल . तसेच नागरिकांनी तक्रारी थेट महानगरपालिकेच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.यानंतर आयुक्तांनी कन्ना चौक, विणकर बाग परिसराची पाहणी केली. येथे नव्याने उभारण्यात आलेले ‘आकांक्षी शौचालय’ लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करण्याचे आदेश देण्यात आले. या शौचालयातील मुतारी (Urinal) सर्वांसाठी मोफत उपलब्ध राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. उघड्यावर जाण्याची प्रथा थांबवण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. विणकर बागेतील बंद असलेले वाचनालय पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्देश देत बागेची स्वच्छता आणि देखभाल करण्यास सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड