
* केएचजी फाउंडेशनकडून चार नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सची घोषणा
मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.) - भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी 'केएचजी इनोव्हेशन फाउंडेशन'ने (KHGIF) कंबर कसली असून, २०२५-२६ या वर्षासाठी चार महत्त्वाच्या आरोग्य-तंत्रज्ञान स्टार्टअप्सची निवड केली आहे. या उपक्रमाद्वारे देशातील कोट्यवधी लोकांना स्वस्त, विना-शस्त्रक्रिया आणि जीवनरक्षक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केवळ शहरांपुरती मर्यादित असलेली उच्च दर्जाची आरोग्य सेवा आता ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे 'सहयोगी' सज्ज झाले आहेत.
या निवडीबाबत बोलताना पद्मविभूषण डॉ. आर. ए. माशेलकर म्हणाले की, हे नवसंशोधक डॉ. घरडा यांच्या जीवन तत्त्वज्ञानाचे मूर्त रूप आहेत. परिवर्तनीय विज्ञान हे केवळ मोजक्या लोकांसाठी नसून ते बहुजन हिताय असायला हवे, यावर आमचा विश्वास आहे. 'कमी खर्चात, अधिक लोकांसाठी, अधिक उत्तम सुविधा' हे सूत्र चारही संशोधक सार्थ ठरवत आहेत.
यामध्ये प्रामुख्याने 'अगत्स्या सॉफ्टवेअर' या कंपनीचा समावेश असून, त्यांनी सुईचा वापर न करता रक्तातील साखर आणि रक्तदाब मोजणारे उपकरण विकसित केले आहे. यामुळे वेदनामुक्त निदानाची सोय उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे, 'रेमेडिओ इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स'ने डोळ्यांच्या उपचारांसाठी ७० टक्के कमी खर्चात ग्लुकोमा निदानाचे तंत्रज्ञान आणले आहे, जे सामान्य दवाखान्यांसाठी वरदान ठरणार आहे. 'फास्ट सेन्स इनोव्हेशन्स'ने सेप्सिस सारख्या जीवघेण्या आजाराचे निदान अवघ्या काही मिनिटांत करण्याची क्षमता विकसित केली आहे, तर 'आयु डिव्हाइसेस'ने डिजिटल स्टेथोस्कोपच्या माध्यमातून हृदय आणि फुफ्फुसांच्या आजारांचे अचूक निदान प्राथमिक आरोग्य केंद्रांतच शक्य केले आहे.
प्राध्यापक अनिल गुप्ता यांनी नमूद केले की, भारताच्या आरोग्य व्यवस्थेला कलाटणी देणारे तंत्रज्ञान अशा शास्त्रज्ञांकडून येत आहे ज्यांना गुणवत्तेशी तडजोड न करता खर्च कमी करणे शक्य आहे, असे वाटते. या स्टार्टअप्सना केएचजी फाउंडेशनतर्फे तांत्रिक मार्गदर्शन, भांडवल आणि बाजारपेठेसाठी आवश्यक नेटवर्क पुरवले जाणार आहे. गेल्या वर्षीच्या दोन स्टार्टअप्ससह आता एकूण सहा प्रकल्प एकत्रितपणे भारतातील असंसर्गजन्य रोगांशी लढा देण्यासाठी सज्ज आहेत.
रुग्णालयाबाहेरही अचूक निदान आणि उपचार उपलब्ध करून देणारे हे तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने 'डिजिटल इंडिया' आणि 'स्वस्थ भारत' या स्वप्नांना बळकटी देणारे ठरेल, अशी खात्री व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी