
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.) : तालुक्यातील पहेल गावच्या सरपंच करिष्मा प्रसाद मांजरे यांना यंदाचा दैनिक महासागरतर्फे देण्यात येणारा “रायगड रत्न आदर्श सरपंच” पुरस्कार प्रदान करण्यात आला. भव्य व दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला असून, या यशामुळे संपूर्ण माणगाव तालुक्याचा गौरव वाढला आहे.
करिष्मा मांजरे यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी नेतृत्व केले आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यामुळे गावातील मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
तसेच शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून त्या थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, तसेच शैक्षणिक सुविधा वाढविण्यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावात विकासाबरोबरच सामाजिक सलोखाही दृढ झाला आहे.
ग्रामपंचायतीचा पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार, तसेच ग्रामसभांमध्ये नागरिकांचा वाढता सहभाग यामुळे लोकशाही बळकट करण्यास मदत झाली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि सहकाऱ्यांना समर्पित करत भविष्यातही विकासकामे अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. या सन्मानानिमित्त पहेल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)