
अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.)।
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरपंचपदाशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात अंतरिम दिलासा दिला आहे. याचिकाकर्त्या सरपंच सरला इंगळे यांच्या विरोधातील शासनाचे आदेश तात्पुरते स्थगित केले आहेत. त्यामुळे सरला इंगळे या सरपंचपदी कायम झाल्या असून येथे सरपंचपदाकरिता आयोगाने लावलेली निवडणूक देखील रद्द करण्यात आली आहे. भातकुली तालुक्यातील खोलापूर गावातील अतिक्रमण आणि निधी अपहाराचा ठपका ठेवत अतिरिक्त आयुक्तांनी सरपंच सरला इंगळे यांना अपात्र घोषित केले होते. याविरोधात त्यांनी मंत्र्यांकडे दाद मागितली असता याप्रकरणात ग्रामविकास मंत्र्यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या विरोधातच निर्णय दिला होता. त्यामुळे सरला इंगळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या आदेशांना आव्हान देण्यात आले होते.
न्यायालयाने प्राथमिकदृष्ट्या असे नमूद केले की, मंत्र्यांनी दिलेला आदेश अपिलाचा योग्य निकाल वाटत नाही. तसेच अतिरिक्त आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अहवालावर स्वतंत्र विचार न करता निर्णय घेतल्याचेही दिसून येते. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने संबंधित सर्व आदेशांना स्थगिती दिली असून प्रकरणाची पुढील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, थेट सरपंचपदासाठी २८ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेलाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही प्रक्रिया राबवू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी