सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी ‘टेलिकॉम प्रिपेअर्डनेस फ्रेमवर्क’वर भर
अखंड दूरसंचार सेवेसाठी मोठी तयारी नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.) : सिंहस्थ कुंभमेळा 2027 दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या प्रचंड गर्दीत अखंडित दूरसंचार सेवा उपलब्ध राहावी यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने मुंबईत दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपन
सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी ‘टेलिकॉम प्रिपेअर्डनेस फ्रेमवर्क’वर भर


अखंड दूरसंचार सेवेसाठी मोठी तयारी

नाशिक, 22 एप्रिल (हिं.स.) : सिंहस्थ कुंभमेळा 2027 दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या प्रचंड गर्दीत अखंडित दूरसंचार सेवा उपलब्ध राहावी यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने मुंबईत दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांसोबत उच्चस्तरीय कार्यशाळा आयोजित केली. या बैठकीत ‘टेलिकॉम प्रिपेअर्डनेस फ्रेमवर्क’ तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री सल्लागार कौस्तुभ धवसे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, आयजी राजेश प्रधान, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, डीआयजी (वायरलेस) जी. श्रीधर, एसपी (वायरलेस) राजा रामास्वामी तसेच नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन आणि अतिरिक्त कुंभमेळा आयुक्त कमलाकर रणदिवे उपस्थित होते.

या कार्यशाळेत एअरटेल, जिओ, बीएसएनएल, व्होडाफोन आयडिया, टाटा कम्युनिकेशन्स, नोकिया, ह्यूजेस, इंडस टॉवर्स, सी-डॉट आणि इतर प्रमुख दूरसंचार व तंत्रज्ञान कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.

कुंभमेळा प्राधिकरणाच्या अंदाजानुसार सिंहस्थ कुंभ 2027 दरम्यान नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे 12 कोटींपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता असून, मुख्य पर्वणी 15 जून ते 30 सप्टेंबर 2027 दरम्यान होणार आहे. अमृत स्नानाच्या दिवशी सुमारे 2.25 कोटी भाविक एकाच दिवशी उपस्थित राहण्याचा अंदाज असल्याने दूरसंचार यंत्रणेवर प्रचंड ताण येणार आहे.

या पार्श्वभूमीवर पाच स्तरांवर आधारित कनेक्टिव्हिटी आराखड्यावर चर्चा झाली. यामध्ये 5G तंत्रज्ञान, नेटवर्क स्लाइसिंग, ‘सेल्स ऑन व्हील्स’द्वारे मोबाईल नेटवर्क क्षमता वाढविणे, प्रशासन व सुरक्षेसाठी स्वतंत्र नेटवर्क, आपत्कालीन सेवांसाठी मिशन-क्रिटिकल कम्युनिकेशन, मजबूत फायबर व IP बॅकहॉल व्यवस्था तसेच अंतिम पर्याय म्हणून उपग्रहाधारित कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे.

ही संपूर्ण व्यवस्था ‘डिजिटल कुंभ’ संकल्पनेला बळ देणारी ठरणार असून एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गर्दी व्यवस्थापन, ड्रोन सर्वेक्षण आणि बहुभाषिक भाविक सेवा अॅप यांनाही यामुळे मोठी मदत होणार आहे.

या कार्यशाळेत मिळालेल्या सूचनांच्या आधारे कुंभमेळा प्राधिकरण लवकरच सविस्तर अंमलबजावणी आराखडा तयार करणार असून 31 ऑक्टोबर 2026 पासून टप्प्याटप्प्याने कामे सुरू करण्याचे नियोजन आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande