
पुणे, 22 एप्रिल (हिं.स.)। महारेराने गेल्या आर्थिक वर्षात राज्यात तब्बल १० हजार ३७९ गृहनिर्माण प्रकल्पांना विविध परवानग्या दिल्या आहेत. यातील ४ हजार २०४ गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरा नोंदणी क्रमांक मंजूर करण्यात आले आहेत. तर २ हजार ४८८ गृहनिर्माण प्रकल्पांतील सुधारणांना मंजुरी देण्यात आली. तसेच, जुन्या प्रकल्पांबाबत विकासकांनी प्रस्तावित आराखड्यासह केलेल्या विनंतीनुसार ३ हजार ६८७ गृहनिर्माण प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील स्थावर संपदा क्षेत्राला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.
गृहनिर्माण प्रकल्पाला महारेराकडून मंजुरी घेताना सादर केलेल्या प्रस्तावात काही दुरुस्त्या, बदल किंवा वाढ करण्यात आली असल्यास या सर्व सुधारणा महारेराकडून वेळोवेळी नियमित करून घेणे बंधनकारक आहे. तसेच महारेराकडे नोंदणी करताना विकासकांना प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रकल्प पूर्ततेची निश्चित तारीख द्यावी लागते. प्रकल्पाला काही कारणाने उशीर झाल्यास अशावेळी संबंधित विकासकांना महारेराकडून मुदतवाढ घ्यावी लागते. मुदतवाढ न घेतल्यास प्रकल्प व्यापगत प्रकल्पांच्या यादीत जाऊन त्याचे काम प्रभावित होते. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महारेराकडून मुदतवाढ घेणे म्हणून अत्यावश्यक आहे.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु