समुद्रकिनारी गूढ मृत्यू; चिठ्ठीतून आत्महत्येचा संकेत
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.) : अलिबाग समुद्रकिनारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) सायंकाळी घडली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरून संबंधित महिलेने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
Mysterious death on the beach; Note hints at suicide


रायगड, 22 एप्रिल (हिं.स.) : अलिबाग समुद्रकिनारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) सायंकाळी घडली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरून संबंधित महिलेने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रकिनाऱ्यावर एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याचे जीव रक्षकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही माहिती अलिबाग पोलिसांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

महिलेच्या शेजारी एक पर्स आढळली. मात्र, पर्सची तपासणी केली असता तिची ओळख पटविणारा कोणताही पुरावा सापडला नाही. स्थानिकांच्या मदतीने संबंधित महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

दरम्यान, महिलेच्या पर्समध्ये एक चिठ्ठी सापडली असून त्यात तिने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. चिठ्ठीवर ‘पी. जी. पाटील’ अशी सही असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.

मृत महिलेचे वय अंदाजे ४० वर्षे असून उंची सुमारे साडेपाच फूट, अंगाने सडपातळ व वर्ण निमगोरा आहे. तिची ओळख अद्याप पटलेली नाही. संबंधित महिलेबाबत माहिती असल्यास अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande