
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.): शिवसेना बाळासाहेब ठाकरे (शिंदे गट) बांधकाम कामगार सेनेच्या रायगड जिल्हा उपजिल्हाध्यक्षपदी मकसूद नजरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रीतम सुभाष धारिया आणि रायगड जिल्हाध्यक्ष निलेश लक्ष्मण पवडमल यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल श्रीवर्धन येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने नुकतेच अधिकृत नियुक्तीपत्र जाहीर करण्यात आले असून ही नियुक्ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेनुसार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे.
नियुक्तीनंतर आयोजित स्वागत सोहळ्यात नवनिर्वाचित उपजिल्हाध्यक्ष मकसूद नजरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. दानिश लांबे, मौलाना रियाज काझी, माजी नगराध्यक्ष फैसल हुर्जुक, मुदस्सर जमादार, इस्माईल मुंशी, इमरान मुंशी, सिरत हुर्जुक, राजी नाझीर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी नजरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कामगारांच्या हक्कांसाठी ठामपणे काम करण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी मकसूद नजरी यांनी सर्वांचे आभार मानून संघटनेच्या वाढीसाठी आणि कामगारांच्या हितासाठी निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)