
अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.)।
परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणात पोलिस तपासात महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली असून, आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याने रील शूट करताना वापरलेले शस्त्र व वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. या रीलमध्ये दिसणारे दोन पिस्टलसदृश शस्त्र व महिंद्रा थार वाहन हे राजेश रोशन प्रजापती (वय अंदाजे ५०, रा. सावळी दातुरा, ता. अचलपूर) यांच्या मालकीचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.यानंतर पोलिसांनी संबंधितांकडून दोन्ही गन तसेच थार वाहन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या पिस्टलचा बोअर (व्यास) कमी असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले असून, त्याची सखोल तपासणी करण्यासाठी ते तज्ञांकडे पाठविण्यात येणार आहे. अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, आरोपी अयानने रील शूट करताना वापरलेला मोबाईल फोन विकून टाकल्याचेही उघड झाले आहे. संबंधित मोबाईल खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडून पोलिसांनी तो ताब्यात घेतला असून, गुन्ह्याच्या तपासासाठी तो जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असून, पुढील पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी