
रायगड, 22 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता मान्सून काळात उद्भवणाऱ्या पूर, अतिवृष्टी, वीज पडणे आदी आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. नियोजन भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, तटरक्षक दलाचे अभिषेक कुमार व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले की, पावसाळा सुरू होण्यास अवघा एक महिना शिल्लक असून धोकादायक ठिकाणांची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी आवश्यक निवाऱ्यांची तयारी करावी. आपदामित्रांची भूमिका महत्त्वाची असून प्रत्येक विभागाने २४x७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवावा. जलसंपदा विभागाने धरणांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, तर आरोग्य विभागाने औषधसाठा व लसी उपलब्ध ठेवाव्यात, असे त्यांनी निर्देश दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पूल व रस्त्यांची दुरुस्ती करून पर्यायी मार्ग तयार ठेवावेत. तसेच बचाव साहित्य, रुग्णवाहिका, बोटी, लाईफ जॅकेट्स, जनरेटर आदी साधनसामग्री सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. नगरपालिका व महानगरपालिकांनी ३१ मेपूर्वी नालेसफाई पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर नियोजनबद्ध तयारी करण्याचे आवाहन नेहा भोसले यांनी केले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)