
सोलापूर, 22 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक ६ येथे प्रभाग क्रमांक २२, २३ व ६ मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा व ड्रेनेज समस्यांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. सदर बैठक माननीय उपमहापौर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बैठकीत उपमहापौरांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक सूचना देत आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. विशेषतः नाल्यांची नियमित व वेळेत साफसफाई करण्यावर भर देण्यात आला. तसेच, झोन क्रमांक ६ मधील ज्युनिअर इंजिनिअर (JE) यांना सर्व प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले.नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरू नये यासाठी नाल्यांची तातडीने साफसफाई करून योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यावरही उपमहापौरांनी विशेष भर दिला.या बैठकीस प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक गणेश दादा वानकर, सत्यजित वाघमोडे, किसन भाऊ जाधव, नगरसेविका चैताली गायकवाड, शिवराज गायकवाड भाजप दक्षिण मंडळ अध्यक्ष महेश देवकर, महादेव गवळी, अर्जुन गायकवाड, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त यादव मॅडम, पाणीपुरवठा अधिकारी चौबे साहेब, ड्रेनेज विभाग अधिकारी रामचंद्र पेंटर, झोनल अधिकारी पानगल साहेब तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड