
परभणी, 22 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी, तसेच रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्याची वेळ येऊ नये यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.
सन 2025-26 या आर्थिक वर्षातील राज्य निधी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत प्राप्त निधीच्या नियोजनाबाबत मुंबई येथील आरोग्य भवनात आढावा बैठक पार पडली. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत महाराष्ट्र राज्य औषधी द्रव्ये व साहित्य खरेदी प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच सन 2024 ते 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या औषधे व यंत्रसामुग्री खरेदीचे परीक्षण करण्यात आले. चालू वर्षातील कामकाजाचे नियोजन आणि रेट कॉन्ट्रॅक्ट प्रक्रियेच्या अंमलबजावणीवरही सविस्तर चर्चा झाली.
आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे सांगताना, राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये पीसीओडी (PCOD) क्लिनिक सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. महिलांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
“एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या अभियानाच्या वर्षपूर्ती निमित्त आढावा घेण्यात आला. थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार असून रुग्णांना नियमित रक्त संक्रमणाची गरज भासते. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत, वधू-वर सूचक मंडळांमार्फत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्हास्तरावर थॅलेसेमिया रुग्णांना नियमित दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमनिहाय प्रस्तावित अंदाजपत्रक, कार्यक्रम खर्च आणि अनिवार्य खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis