प्रतिमा सरोदे यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित
परभणी, 22 एप्रिल (हिं.स.) : परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रतिमा अतुल सरोदे (शिवसेना उबाठा) यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा शुक्रवार, दि. 24 एप्रिल रोजी क
Q


परभणी, 22 एप्रिल (हिं.स.) : परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी प्रतिमा अतुल सरोदे (शिवसेना उबाठा) यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा शुक्रवार, दि. 24 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

दरम्यान, महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठीही बुधवारी अर्ज दाखल करण्यात आले. प्रभाग समिती ‘अ’ साठी रईस खान सरफराज खान (शिवसेना उबाठा), प्रभाग समिती ‘ब’ साठी खान मुसद्दीक खान नुरुल्ला खान (काँग्रेस) आणि प्रभाग समिती ‘क’ साठी तबस्सुम वसीम शेख (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज सादर केले.

तसेच समाजकल्याण समितीसाठी प्रा. राजेश रणखांबे (शिवसेना उबाठा), महिला व बालकल्याण समितीसाठी अश्विनी अमोल जाधव (काँग्रेस), स्थापत्य समितीसाठी सायरा बेगम अलीमोद्दीन काजी (शिवसेना उबाठा), वैद्यकीय व आरोग्य समितीसाठी अबोली अनिल कांबळे (शिवसेना उबाठा), शहर सुधार समितीसाठी शुभांगी शुभम पाष्टे (शिवसेना उबाठा), माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक समितीसाठी शमदा बेगम सय्यद इलाही (काँग्रेस) तसेच विधी समितीसाठी रुखसाना बेगम अब्दुल हमीद जागीरदार (काँग्रेस) यांनी अर्ज दाखल केले आहेत.

अर्ज स्वीकृती प्रक्रिया बुधवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत नगरसचिव कार्यालयात पार पडली. यावेळी महापौर सय्यद एकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, गटनेते तसेच अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

स्थायी समिती सभापती निवड बैठक शुक्रवार, सकाळी 11 वाजता बी. रघुनाथ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. प्रतिमा सरोदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणे ही केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यांच्या संभाव्य निवडीबद्दल महापौर, उपमहापौर आणि सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande