
लातूर, 22 एप्रिल (हिं.स.) : संभाव्य ‘एल निनो’मुळे यंदाचा मॉन्सून अनिश्चित राहण्याची शक्यता असून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या.
जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले की, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता असल्याने सध्याचा जलसाठा जपून वापरणे अत्यंत आवश्यक आहे. उपलब्ध पाणी प्राधान्याने पिण्यासाठी वापरण्यावर भर द्यावा तसेच सिंचन प्रकल्पांमधून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.
याशिवाय, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नियोजन करावे, असे निर्देशही देण्यात आले. पावसाच्या अनिश्चिततेमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
जलसंधारणावर भर देत जिल्हाधिकारी म्हणाले की, पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी व्यापक मोहिमा राबविणे आवश्यक आहे. विहीर व विंधन विहीर पुनर्भरण, ‘जलतारा’ उपक्रम, तसेच सिंचन प्रकल्पांतील गाळ काढण्याची कामे गतीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरी भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली कार्यान्वित करण्यावरही भर देण्यात आला.
बैठकीच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी जिल्ह्यातील जलसाठ्यांची सद्यस्थिती व संभाव्य टंचाई आराखडा सादर केला. सध्या जिल्ह्यात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी काही ठिकाणी उपाययोजना आवश्यक ठरू शकतात. आतापर्यंत 13 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच तालुकास्तरावर दर आठवड्याला पाणी टंचाईचा आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis