
नामवंत स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागवले
लातूर, 22 एप्रिल (हिं.स.) : अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या 19 जानेवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार ही पुनर्रचना करण्यात आली असून, आता ही समिती निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार आहे.
या समितीमध्ये जिल्ह्यातील तीन नामवंत अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींना सदस्य म्हणून समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अल्पसंख्याक समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव सर्व आवश्यक पुराव्यांसह सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर येथे 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही माहिती जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी दिली आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis