मेळघाटात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; वन्यजीवांवर संकटाचे सावट
अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.) : नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आणि घनदाट जंगलांनी वेढलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसर सध्या तीव्र पाणीटंचाईच्या छायेत सापडला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच येथील प्रमुख नद्या आटण्यास सुरुवात झाल्याने पर्यावरणीय संतुलना
मेळघाटातील नद्या एप्रिलमध्येच आटल्या वन्यजीवांसमोर पाण्याचे गंभीर संकट


अमरावती, 22 एप्रिल (हिं.स.) : नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आणि घनदाट जंगलांनी वेढलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसर सध्या तीव्र पाणीटंचाईच्या छायेत सापडला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच येथील प्रमुख नद्या आटण्यास सुरुवात झाल्याने पर्यावरणीय संतुलनाबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.

मेळघाटातून वाहणाऱ्या तापी नदी, सिपना नदी, गडगा, खंडू, खापरा, डवाल, कोकरी आणि तलवार या नद्यांची पातळी एप्रिल महिन्यातच लक्षणीयरीत्या घटली आहे. यापैकी काही नद्या पूर्वी बारमाही म्हणून ओळखल्या जात होत्या, मात्र यंदा त्या वेळेआधीच आटल्याचे दिसून येत आहे.

या परिस्थितीमुळे जंगलातील वाघ, बिबट्या, हरणे आणि इतर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. परिणामी, मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक आणि वनप्रेमींच्या मते, अनियंत्रित वृक्षतोड, जंगलातील पाणवठ्यांचे अपुरे नियोजन आणि बदलते हवामान हे या संकटामागील प्रमुख घटक आहेत.

दरवर्षी वनविभागाकडून कृत्रिम पाणवठ्यांसाठी निधी खर्च केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे पाणवठे कोरडेच असल्याची तक्रार समोर येत आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. प्रमुख नद्यांवर लहान-मोठे साठवण प्रकल्प उभारणे, कोल्हापुरी बंधारे बांधणे, जलसंधारणाच्या कामांना गती देणे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande